गुलमोहर!


        ही अशी भलीमोठी, भिंत आणि मन व्यापलेली पश्चिमेची खिडकी. तिच्या काळ्या उभ्याआडव्या गजांआडून दिसणारा गुलमोहराचा पसारा.

अस्ताव्यस्त पसरलेल्या, तशाच उभ्याआडव्या फांद्या आणि त्यांना सांभाळत किंचित वाकूनही बहराचा ताठा जपणारा तो गुलमोहर. हिरव्या पानांमध्ये  सवयीनं खोचून ठेवावी तशी रक्तवर्णी फुलांची दाटी -खालीही तस्साच गालिचा मुद्दामच पसरल्यासारखा.  भर पहाटे, दिवसा  आणि संध्याकाळीसुद्धा.


 कसं जमतं या गोष्टींना असं समोरच्याला स्वतःत गुंतवून बुडवून ठेवणं.?


         कितीही वेळा पाहिलं तरी ना नजर भरते, ना मन. त्यातही क्षणाक्षणाला बदलणारी छटा, तीही लोभस!

 प्रत्येक क्षणाचीही धुंदी वेगळी -ओढून घेणारी. पहाटे पहाटे कोयरीतल्या कुंकवासारखा पवित्र वाटणारा तो सडा, दिवसभर गुंतवूनही  संध्याकाळी पुन्हा नशिला वगैरे कसा होत असेल.?

संध्याकाळही तशीच- रंग माखलेलं आभाळ घेऊन त्या  लालहिरव्या गुलमोहरी जाळीत स्वतःला विखरून पसरून ठेवणारी. नजर ढळूही न देता आत आत भिनत जाणारी-विषासारखी.

खोलवर जाऊन जुन्या गाठी उसवत बांधत राहणारी संध्याकाळ. आणि गुलमोहर. आणि या जीवघेण्या फासात अडकलेलं, फसलेलं मन!

व्यसनं अशी खरंच जीवघेणी असतात, ना.?!

गुलमोहर!
©ऋतु

Comments

Popular posts from this blog

वाट पाहताना..

आभाळाच्या गोष्टी!

पारिजातकाचे दिवस.!

निरोप.!

संध्याकाळ!